हिमालयातील संकुल मंदिरे

 

भारतामध्ये आणि भारताबाहेरही मंदिर स्थापत्याचे अनेक मनोरम आविष्कार ठिकठिकाणी बघायला मिळतात. कुठे प्रचंड भव्य मंदिरे तर कुठे दुर्गम ठिकाणी उभे एकांडे देऊळ, कुठे पंचायतन म्हणजे एक मुख्य मंदिर आणि बाजूची चार उपमंदिरे अशी रचना, तर कुठे समोरासमोर अशी जोड मंदिरे. याच प्रकारे बऱ्याच ठिकाणी मंदिर समूह किंवा मंदिर संकुल म्हणजे एकाच आवारात उभी लहान मोठी अनेक मंदिरे , देवळ्या , चौथरे, जलकुंडे, ओवऱ्या यांचा महामेळ  !

मध्य प्रदेशातले बटेश्वर , कर्नाटकातील पट्टडकल येथील मंदिरे किंवा ओरिसा मधील लिंगराज मंदिर परिसर , हे सगळे मंदिर समूह  आपल्या परिचयाचे आहेत. या लेखामध्ये आपण नगाधिराज हिमालयाच्या छत्रछायेखाली विराजमान असे काही मंदिर समूह मनाच्या वेगाने जाऊन बघून येणार आहोत.

उत्तराखंडमधील कुमाऊं प्रदेशाचे नाव कूर्म - म्हणजे भगवान विष्णूचा दुसरा अवतार, कासव यावरून पडले आहे. जरा सौम्यसे चढ- उतार आणि  निळ्या गहिऱ्या पाण्याची सरोवरे , बिनसर किंवा रामगढ च्या नितांत सुंदर दर्‍या-खोर्‍या , पनगोत चे पक्ष्यांनी किलबिलणारे जंगल आणि काही अत्यंत देखणी मंदिरे  यामुळे कुमाऊंची भूमी ही इंद्रियांना सुखावणारी आहे.

अशाच हिरव्यागार टेकड्या, आणि आभाळाला भिडणाऱ्या देवदार वृक्षांच्या वनराजी मधून प्रवास करत आपण जागेश्वरच्या उंबरठ्यावर पोहोचतो.  परमेश्वर शिव , तोच तो उग्र ,रुद्र , पशुपती , नटराज शंकर, त्याच्या निवासाच्या योग्यतेचे, हिमालयाच्या छायेतले भव्य नैसर्गिक प्रांगण म्हणजेच अलमोडा जिल्ह्यातील जागेश्वर हे देऊळ गाव.

जागेश्वरच्या ह्या मंदिर समूहामध्ये १२५ ते १५० अशी लहान मोठी मंदिरे आहेत. त्यातले थोडे अलिकडे असलेले, उंच सुबक दंडेश्वर मंदिर म्हणजे अगदी रंगणाऱ्या रागदारीच्या पहिल्या सुरेल आलापासारखे आहे.

 

'नागर' शैलीच्या मंदिरामध्ये उंच आकाशवेधी शिखरांची योजना असते. शिखराच्या तीन्ही भिंतीवर 'रथ' म्हणजे उभे सलग पट्टे असतात. पट्ट्यांच्या संख्येवरून त्रिरथ, पंचरथ , सप्तरथ वगैरे रचना ओळखल्या जातात. आणि शिखराच्या वर आमलक म्हणजे आवळ्या सारखे उभे कंगोरे कोरलेला गोलाकार दगड. ही नागर शैलीची मंदिरे बहुतकरून उत्तर भारतामध्ये आढळतात. दंडेश्वर मंदिर हे 'रथ'विरहित  मंदिर आहे . त्याच आवारात कुबेर आणि वरुण या देवतांची इतर छोटी मंदिरे आहेत. 

पुढे मुख्य जागेश्वर मंदिर परिसरामध्ये अनेक लहान-मोठी मंदिरे ,शिवलिंग आणि दगडी जलकुंडे आहेत, आणि पाठीमागे उंच उभ्या देवदार वृक्षांची पसरलेली पर्णछाया आहे. मुख्य जागेश्वर मंदिर हे काळ्या पाषाणात असून, शिखरावर मोजके पण देखणे अलंकरण दिसते.  शेजारीच 'वल्लभी' प्रकारचे म्हणजे आडवे शिखर असलेले देऊळ आहे. प्राकारांमधील देवळांच्या शिखरावर लकुलीशाचे अंकन आहे. प्रचलित मताप्रमाणे इसवीसन ७०० - ते १२०० मध्ये ह्या मंदिरांची निर्मिती झाली असावी. काही ग्रंथांमध्ये जागेश्वर हे  महत्वाच्या १२ ज्योतिर्लिंगामधील मानले जाते.

A stone temple with a roof

Description automatically generated with medium confidence

 

शिवाचे परमोच्च स्थान असलेल्या कैलास पर्वताकडे जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी ,प्राचीन काळी हा सुरुवातीचा थांबा होता.  जागेश्वरचे आशीर्वाद घेऊन, उंच पर्वतरांगा ओलांडून, तिबेटच्या भूमीत पोहोचून, उत्तरी हिमालयाच्या बर्फाळ दऱ्या पार करून, पवित्र कैलास पर्वताचा पायथा गाठणे आणि मानस सरोवराच्या स्वर्गीय निळ्या पाण्याला स्पर्श करणे, हा मूक संकल्प कित्येक भारतीय मनांमध्ये पिढ्यानुपिढ्या जपला गेला आहे !

यापुढचे मंदिर संकुल आहे ते रावी म्हणजे वैदिक परुष्णीच्या अंगणातले, हिमाचल प्रदेशातले.

इथल्या चंबा शहराच्या दक्षिणेला  धौलाधार आणि उत्तरेला पीर पंजाल अशा दोन बलाढ्य हिमालयीन पर्वतरांगा आहेत.  राजा शैलवर्माची कन्या चंपावतीवरून चंबा हे या शहराचे नाव पडले. या शहराची स्थापना दहाव्या किंवा अकराव्या शतकात झाली. साहिलवर्मा, शालिवाहन आणि शैलवर्मा, एकाच राजाचे नाव इतिहासामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेले आहे. रस्त्याकडेला लाल मुळे , संत्री आणि बोरे विकणारे विक्रेते, शाळकरी मुलांची झुम्मड,  कापड, चपला , मिठाई आणि चाट यांची खचाखच भरलेली दुकाने, असलेले चंबा हे अगदी आनंदी उत्फुल्ल गाव आहे.  या जुन्या आणि गजबजलेल्या गावात  लाकडी कोरीव कामामिश्रित उत्कृष्ट दगडी वास्तुकलेचे  नमुने बघायला मिळतात. 

A stone building with blue doors

Description automatically generated

 

 

इथले लक्ष्मीनारायण मंदिर हे एक मंदिर संकुल आहे ज्यामध्ये ३ मोठी मंदिरे, ३ लहान मंदिरे आणि अनेक छोट्या देवळया आहेत. मंदिराबाहेर गरुड स्तंभ आहे. मुख्य देवता अर्थातच लक्ष्मी-नारायण म्हणजे विष्णुचे एक रूप आहे. रेशमी वस्त्र, दागिने आणि हारांनी सजलेली वैकुंठ विष्णुची मोठी धातूची मूर्ती अतिशय आकर्षक दिसते. राधेश्याम आणि लक्ष्मी दामोदर ही  अजून दोन मंदिरे विष्णू देवतेला समर्पित  आहेत. चंद्रगुप्त महादेव, गौरी शंकर आणि महा मृत्युंजय  या शिव पार्वतीला समर्पित असलेल्या तीन मंदिरामुळे म्हणावे तर शंकरालाही समान  वाटा आहे.  उत्तम नागर शैलीत बांधलेली ही मंदिरे दहाव्या शतकातील असली तरी काही गर्भगृहातील मूर्ती बहुतेक अलीकडच्या काळातील आहेत.

A close-up of a stone building

Description automatically generated

 

वैकुंठ विष्णू ह्या विष्णूच्या प्रतिमेमध्ये चार चेहरे  दाखवले जातात .. दर्शनी मुख 'सौम्य' आहे, डावीकडे वराह आहे. उजवीकडे नरसिंह आहे आणि मागील बाजूस  भयंकर मुख  'कपिल' आहे जो आपल्याला दिसत नाही.  विष्णूचे वैकुंठ रूप देखील पांचरात्र' संहितेच्या चातुर्व्यूह संकल्पनेशी संबंधित आहे. या परिसरात वैकुंठ मूर्तींची विपुलता आहे. इतिहास सांगतो की खजुराहो येथील लक्ष्मण मंदिरातील वैकुंठ मूर्ती ही कैलास-चंबा  प्रदेशातून राजा यशोवर्मन चंदेल याने  आणली होती. तसेच सर्व मंदिर शिखरांवर 'त्रिमूर्ती' शिल्प आहे. ही त्रिमूर्ती म्हणजे नेहमीची ब्रह्मा-विष्णू-महेश किंवा वैकुंठ विष्णूची तीन पुढची मुखेही नाहीत. हे तीन चेहरे आहेत, कदाचित सदाशिव मुखे असू शकतात, सदाशिव हे शिव मूर्तीचे चार चेहऱ्याचे रूप आहे.  प्रसिद्ध घारापुरी (एलिफंटा लेणी) शिल्पाप्रमाणे चौथा चेहरा अदृश्यमान आहे.   त्यामुळे महादेव शिव शिखरावर विराजमान आहेत तर विष्णू  गर्भगृहामध्ये !

जवळच असलेले हरिराय मंदिर हे त्यातील वैकुंठ विष्णू मूर्तीसह,दगडी वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे. मंदिर मध्यम आकाराचे आहे. त्याचे अप्रतिम कोरीवकाम केलेले उंच शिखर  आसपासच्या शहरी गराड्यातून उठून दिसते. मंदिरांची एके काळीची रम्य ठिकाणे आता शहरी गोंगाटाने बकाल झालेली पाहणे हे फार क्लेशकारक आहे. इथेच नाही तर भारतात बऱ्याच धार्मिक स्थळी, जे स्थान शुद्ध, शांत आणि पवित्र असावे अशी आपली अपेक्षा आहे त्याच  जमिनीच्या तुकड्यावर आजूबाजूची  सतत विस्तारणारी वस्ती वेगाने अतिक्रमण करू पाहते आहे. 

आणि ह्या शहरी गर्दीच्या विरुद्ध , अगदी टोकाची परिस्थिति आहे आपल्या पुढच्या मंदिर समूहामध्ये !

काश्मीर म्हणजे प्राचीन सतीसर, ह्या महाविशाल सरोवरातील जलोद्भव दैत्याचा नाश करून, ह्या सरोवरातील पाण्याचा वराहमूल म्हणजे बारामुल्ला येथून निचरा करून, कश्यप ऋषींनी ही पवित्र काश्मीर भूमी निवासासाठी योग्य केली, असे नीलमत पुराणात वर्णन आहे.

कश्यप ऋषींच्या ऋणातली  ही भूमी, भारतीय इतिहास समृद्ध करणाऱ्या विविध तत्त्वज्ञानांची आणि तत्वज्ञांची पुरातन काळी मातृभूमी  बनली होती. काश्मीर शैव मत  (शैव परंपरा आणि तत्त्वज्ञानाची एक शाखा), श्री विद्या सारख्या तांत्रिक ग्रंथांचे अनुचर , तसेच बौद्ध तत्व आणि त्यावरील सभा-चर्चा, संगिती यामुळे काश्मीरची  धरती  ही भारताच्या सनातन धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाची मुकुटमणि शोभत असे. इसवीसनाच्या पहिल्या सहस्रकात अनेक राजांनी काश्मीरमध्ये आणि आजूबाजूच्या प्रदेशात अनेक मंदिरे , कुंड किंवा हौद यांची स्थापना केली.

असाच एक खजिना नारानाग  येथे लपलेला आहे. श्रीनगरच्या उत्तरेला, काश्मीर खोऱ्याच्या कडेवर हरमुख पर्वत आहे. गंदरबल , म्हणजे नक्कीच प्राचीन गंधर्व बल असावे म्हणजे गंधर्वांसाठी तलाव असा अर्थ असणारे शहर याच्या पायथ्याशी आहे.

सतत धुमसत, घुसळत, वेगाने वाहणारी आणि हिमालयीन सौंदर्याने नटलेली, झेलम म्हणजेच वितस्ता नदीला भेटण्यासाठी अनंत काळ धावणारी प्रवाही सिंध नदी , हा डोंगर चढताना आपली सोबती आहे. आकाशाकडे झेपावणारे देवदार , डोंगर उतारावर गर्दी करणारे पोपलार, जर्दाळू आणि बर्च, नदीवरचा  पूल ओलांडला कि सामोरे येणारे रुंद खोरे , हिरव्यागार शेतां मध्ये मोहरीच्या सोनेरी पिवळ्या पीकाचे चमकदार ठिपके, डोंगरात वसलेली छोटी गावे आणि रस्त्याच्या कडेला गुलाबी-पांढऱ्या फुलपाकळ्यांनी बहरणार वसंत ऋतू !  एक निःसंशय सुंदर दृश्य , डोळ्यांना रिझवणारे आणि मन शांत करणारे !.

सध्या नारानाग नावाने ओळखलं जाणारा हा मंदिर समूह  मूळ 'वसिष्ठ'  आणि आताचे वांगथ असलेल्या गावाजवळ आहे .   डोंगराच्या एका बाजूस दरीतून वाहणारी वांगथ नदी दिसते.  इथे मंदिरांचे दोन गट आहेत. आपण ज्या पश्चिमेकडील गटाला प्रथम भेट देतो, तो ज्येष्ठरुद्र, या शिवस्वरूपाला समर्पित आहे आणि पूर्वेचा समूह ,  सर्व प्राण्यांचे अधिपती म्हणजे भूतेश्वर महादेवाला समर्पित आहे.

A stone building with a roof

Description automatically generated

 

दोन्ही मंदिर समूह जवळपास  खंडित अवस्थेमध्ये आहेत.   पश्चिम गटात एक मुख्य देऊळ अजूनही उभे आहे.  सुमारे सहा मीटर उंचीचे,  राखाडी ग्रॅनाइट दगडांमध्ये बांधलेले , काश्मीर स्थापत्यकलेची अगदी प्रातिनिधिक अशी वैशिष्ट्यपूर्ण त्रिकोणी कमान आणि प्राचीन रोमन खांबांची आठवण करून देणारे उंच स्तंभ आणि बर्फापासून बचाव करणारे त्रिकोणी निमुळते पिरॅमिड शिखर असलेले हे देवालय  , विशाल आणि प्रभावी स्थापत्याचा नमुना आहे.  मुख्य मंदिराभोवती चारहून  अधिक लहान मोठी मंदिरे आहेत.  हे कदाचित पंचायतन पद्धतीचे मंदिर असू शकेल. त्यातील फक्त एका मंदिरात अखंड शिवलिंग अजूनही टिकून आहे.  जरा पलीकडे पाचूच्या रंगाचे , हिमालयीन जलाने काठोकाठ  भरलेले कुंड, भव्य ज्येष्ठरुद्र मंदिर आणि पाठच्या डोंगरावरील, देवदारुच्या घनदाट वनाची पार्श्वभूमी ! अगदी तप , साधना, ध्यान यासाठी सुयोग्य असे हे ठिकाण आहे.

काही मीटर पुढे गेल्यावर एक प्रचंड मोठा चौथरा, ज्यावर अनेक दगडी खांब  उभे असावेत असा आपल्याला दिसती. आणि त्याच्या पलीकडे भूतेश्वर मंदिराचा मोठा परिसर, ज्यात मुख्य व इतर मंदिराचे भग्नावशेष आहेत असा डोळ्यासमोर येतो.  हा परिसर शोडरतीर्थ या नावानेही ओळखला जात असे. काश्मीराच्या इतिहासाचे वर्णन असलेल्या राजतरंगिणी या कल्हण रचित ग्रंथानुसार ही मंदिरे इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकाच्या प्रारंभापूर्वी मौर्य सम्राट अशोकाचा मुलगा जललोक याने बांधली होती. पुढे इसवी सनाच्या सातव्या शतकात कर्कोटक घराण्यातील पराक्रमी शूर राजा ललितादित्य मुक्तापिड याने आता दिसणारा  पाषाण स्थापत्याचा हा देखणा अविष्कार निर्माण केला . उत्पल घराण्यातील राजा अवंतीवर्मन यानेही इसवी सनाच्या नवव्या शतकात या महत्त्वाच्या मंदिर समूहात काही वास्तू  वाढविल्या .

 

नारानाग  मंदिर परिसराचे हिरवेगार मैदान आणि विखुरलेले भग्नावशेष  बघताना , या एकेकाळच्या महामंदिराचे उजाड रूप आपल्याला आज खिन्न करते.  भक्तांपासून वंचित, त्या उंच कातळ भिंती आणि उघडे पडलेले भव्य खांब , जणू काही भक्तांच्या मायेच्या हाताची ,  फुलं-धूपाच्या सुगंधाची , आणि तेवत्या दिव्यांच्या प्रकाशाची वाट बघत आहेत असेच ही एकाकी भग्न उभी मंदिरे पाहून जाणवते.

सुदैवाने बाकी कोणी नाही तरी त्यांच्या साथीला साक्षात तो देवतात्मा हिमवत उभा आहे !

-मनीषा चितळे


विश्व हिंदू परिषदेच्या महामंदीर दिवाळी विशेषांकामधे माझा 'हिमालयातील संकुल मंदिरे' या विषयावरील लेख.

Comments

Popular Posts