छत्तीसगढी बिलासपूर





 छत्तीसगढी बिलासपूरची अवचित झालेली भेट, मनामध्ये चिरस्थायी राहील.

पुण्याची आठवण येईल असे जुन्या बिलासपूरचे गल्लीबोळ, अजून तगून राहिलेले, जुने नक्षीदार सज्जे असलेले, कोरीव खिडक्या असणारे एखादे घर, पूर्ण सुकलेली अर्पा नदी, मोठी झाडे आणि क्षितिजरेषेवर उभे एखादे देऊळ, असे बिलासपूरचे आत्ताच्या बेफाट जगातले, ठाय लयीतले जगणे मनाला भिडलेच.
किती तरी देखणी मंदिरे, शिल्पे आणि तेव्हढीच सुंदर निसर्गचित्रे यांच्यामुळे छत्तीसगढ भटकंतीचा स्मृतिपट मोठा रम्य झाला आहे.


हैहय, कलचुरी आणि नागवंशी राजांची कित्येक शतके या महाकोशल प्रदेशावर सत्ता राहिली आहे. श्रीरामाचे आजोळ असलेला, जंगलांनी वेढलेला, नद्यांनी समृद्ध केलेला प्रदेश आजही त्या सनातन भूतकाळाची लेणी अंगाखांद्यावर वागवतो आहे.
मल्हार हे जुनी राजधानी, तिथले शिखर पडलेले , मंडप नष्ट झालेले पाताळेश्वर आणि किचक मंदिर, देखण्या द्वारशाखा आणि विखुरलेल्या शिल्प वैभवामुळे मनात घर करतात. ताला इथले देवरानी-जेठानी किंवा रुद्र शिव मंदिर तर अजूनच निराळे. केवळ खंडहर रूपातली हि दोन भव्य देवळे तिथल्या काही वेगळ्याच धाटणीच्या शिल्पांनी चकित करतात. शेजारी वाहणारी मणीयारी नदी पुढे जाऊन शिवदेव नदीला मिळते. ह्या शिवदेव नदी मधल्या एका तयार झालेल्या बेटावर आहे केदार क्षेत्र म्हणजे मदकू द्वीप. मांडुक्य ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही जागा, तिथेच सापडलेली एकोणीस मंदिरे , त्यातील योग्यांच्या शिल्पकृती.. उतरत्या उन्हात , सळसळत्या पिंपळाच्या खाली बसून जणू आपण त्या विसरलेल्या काळाशी संवाद करू शकतो.
जांजगीर चे सोनेरी उन्हात तळपणारे विष्णू मंदिर, त्यावरची अफाट कलाकारी , सोबतीला लांब पसरलेला भीम तलाव, वडाची गडद हिरवी आश्वासक छाया आणि समोरचे बिनजोत्याचे शिव मंदिर. इथल्या आख्यायिकेप्रमाणे ही दोन्ही मंदिरे म्हणजे एकाच मंदिराचे दोन भाग, खालचा आणि वरचा !
आता अशी कितीतरी चित्रे नजरेसमोर फेर धरू लागली आहेत.
संध्याकाळच्या उन्हात न्हाऊन निघालेले खरोडचे शबरी मंदिर, विटांमध्ये बांधलेले, लाल-पांढऱ्या रंगसंगतीने खुललेले. त्यानंतर गेलो होतो शेवरी नारायणाच्या पायाशी. केवढे प्रचंड मंदिर, मंदिर संकुलच , अनेक लहान मोठी मंदिरे , देवळ्या आणि भक्ताच्या पायरवाने गजबजलेले. तिथेच उभे विष्णू मंदिर, शिखररहित पण किती देखणे, लाल वालुकाश्माचे, त्या कोरीव द्वारशाखेचे, उभ्या गंगा-यमुना मूर्तीचे कौतुक करावे तितके कमी.
आणि त्यानंतर समोर आला महानदीचा नजरेत न मावणारा विस्तार. घाटावर येऊ पाहणाऱ्या हलक्या लाटा , अस्ताला जाणारा सूर्यनारायण, महानदीच्या पाण्यावर त्याने अंथरलेली दैवी किरणांची नीलसुवर्णी रांगोळी. तिथे बसून, त्या पाण्याला स्पर्श करून जी शांतता अनुभवली त्याला तोड नाही
पण राहून राहून खुणावतो आहे रतनपूरच्या महामाया मंदिराचा परिसर. संध्याकाळच्या आरतीची ढोलक-झान्झानि गुंफलेली सुरावट, महामायेचे शांत प्रदीप्त दर्शन, कुंकवाचा सडा, फुलांचे हार विखुरलेले , उदबत्त्यांचा मिश्र सुवास, लोकांच्या भक्तीचे वातावरणावर झालेले गारुड ! बाहेर आले तर समोर एक निरव जलाशय, आकाशात उंच पोचलेला चंद्रमा आणि त्या प्रकाशात वेगळीच भासणारी दोन-तीन उंच उंच रेखीव शिखरांची मंदिरे. किती भावविभोर आणि साधे आहे हे सनातन सत्य !
छत्तीसगडच्या गावा-गावातून , रस्त्यातून फिरताना नजरेस पडलेली साधी सुधी घरे आणि त्यातील माणसे, मध्ये मध्ये येणारी जलाशयाची हिरवी बिलोरी नक्षी, त्या छोट्या तळ्याभोवती उभी चिमुकली देवळे, बाजूला उभी वड , पिंपळ आकाशवेरी पोचू पाहणारी आणि तळयात पाय सोडून बसलेली.
वसंताच्या चाहुलीने मोहोरलेले केशरी पिवळ्या फुलांचे असंख्य पळस जिथे तिथे लक्ष खेचून घेत होते आणि मोठाल्या लाल गुलाबी फुलांनी निळ्या आकाशात नक्षी काढणारी काटेसावर , कधी देवळात तर कधी पाण्याजवळ भेटली पुन्हा पुन्हा.
ही बिलासपुरी माया, हा भूतकाळाचा ठेवा, हे अदृश्य देवतत्व , हे भारतभूमीच्या गाभ्यातले आनंदक्षण पुन्हा मिळू देत हीच प्रार्थना..

Comments

Popular Posts